Home राजकीय  मनसेसोबत युतीच्या चर्चांबाबत फडणवीसांचं स्पष्ट वक्तव्य

 मनसेसोबत युतीच्या चर्चांबाबत फडणवीसांचं स्पष्ट वक्तव्य


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट वक्तव्य करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “कोणी भेटायला आलं म्हणजे युती होते असं नसतं,” असं सांगत फडणवीसांनी महायुतीत कोणताही बदल होणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानं मनसेसोबत युतीची शक्यता पूर्णतः संपुष्टात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले होते. विशेषतः बेस्ट पतपेढी निवडणुकीत मनसेला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत मनसेकडे एकप्रकारे मैत्रीचा हात पुढे केल्याचा संकेत दिला होता. मात्र, फडणवीसांच्या ताज्या वक्तव्यामुळे हे सर्व अंदाज चुकीचे ठरले.

फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कोणी भेटायला येतं यावरून युती ठरत नाही. आमची महायुती अभेद्य आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणेच लढणार आहोत. महायुतीच विजयी होईल, याबद्दल शंका नाही.” या विधानामुळे मनसेसोबतच्या युतीच्या शक्यतेचे सर्व दोर फडणवीसांनी छाटले आहेत.

याचदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच एका कार्यकर्ता मेळाव्यात विधानसभेतील भाजपवर आरोप करत म्हटले होते की, “2019 मध्ये मनसेच्या मतांची चोरी झाली.” यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी शायराना शैलीत उत्तर दिलं. “मला गालिबचा शेर आठवतो – ‘दिल बहलाने के लिये ख्याल अच्छा है…’”, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांची खिल्ली उडवली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या विजयामागचं विश्लेषणही मांडलं.

फडणवीसांनी पुढे सांगितले की, “2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात भाजपचा विजय झाला तेव्हा काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता होती. जनता का नाकारते आहे याचा आत्मपरीक्षण न करता विरोधक छाती बडवतात, अपमानकारक वक्तव्यं करतात, तोवर त्यांचं पुनरागमन होणार नाही.” त्यांनी विरोधकांच्या राजकारणावर टीका करत सांगितलं की, “सत्य स्वीकारल्याशिवाय विजय मिळणार नाही.”

मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्ट आणि ठाम भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मनसेचा राजकीय मार्ग कोणत्या दिशेने जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. फडणवीसांनी राजकीय स्पष्टतेने दिलेल्या या विधानामुळे महायुतीची पुढील रणनीती अधिक निर्णायक ठरणार आहे.


Protected Content

Play sound