मुंबई । एकनाथ खडसे यांना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर एमआयडीसी जमीन प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता, असे स्पष्ट करत मी घरचे धुणे बाहेर धुत नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला आहे. खडसेंच्या आरोपांचे त्यांनी आज खंडण केले आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काल त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला खूप त्रास झाल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यांनी लवकरच आपण नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान हे पुस्तक लिहणार असून यात अनेक गौप्यस्फोट असतील असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, एकनाथराव खडसे यांच्या आरोपांना आज देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, एमआयडीसीच्या प्रकरणातील आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. नाथाभाऊंवर मी गुन्हा दाखल केला नाही. उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करायला लावला. मात्र विनाकारण गैरसमज व्हायला नको. त्यांच्या ज्या काही तक्रीरी आहेत, त्या घरात बसून मिटवू, असेही ते म्हणाले. तसेच मी घरचे धुणे बाहेर धुत नसल्याचा टोला देखील त्यांनी याप्रसंगी लगावला.