मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीतर्फे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येत असला तरी अद्याप या दिशेने कोणतीही पावले पडत नसल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. ते एकट्यानेच राज्यपालांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र ही भेट झाल्यानंतर त्यांनी आपण फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटल्याचे स्पष्ट केले. तर यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली. त्यांनीदेखील या भेटीत सरकार स्थापन करण्याची चर्चा झाली नसल्याचे सांगत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठीच गेले असल्याचे सांगितले. तथापि, दोन्ही पक्षांचे नेते स्वतंत्रपणे राज्यपालांना भेटल्याचे राजकीय निरिक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.