नागपूर (वृत्तसंस्था) चालत्या कारमध्ये फेसबुक लाईव्ह सुरु असतांना अचानक झालेल्या अपघातात नागपुरात दोन सख्खा भावांचा मृत्यू झाला आहे.
पुंकेश पाटील (वय-२८) आणि संकेत पाटील (वय-२३ ) अशी या दोघांची नावं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अपघातापूर्वी कारमध्ये फेसबुक लाईव्ह सुरू होते. त्यामुळे या अपघाताचा थरार फेसबुकवर कैद झाला आहे. पुंकेश पाटील आणि संकेत पाटील हे दोघेही नागपुरातल्या कैलासनगरमध्ये रहात होते. काटोल तालुक्यात काही खासगी कामानिमित्त ते चालले होते. झायलो या कारेने जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे मित्रही होते. कार सुरू असताना मित्र फेसबुक लाईव्ह करत होते. हातला येथील शिवाराजवळ जेव्हा गाडी आली तेव्हा एकामागोमाग एक कारना ओव्हरटेक करण्याच्या नादात झायलो कारवरचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात पुंकेश आणि संकेत या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल आणि नागपुरातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.