जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि बोदवड तालुक्यातील चर्मकार समाज बांधव अमोल बाविस्कर यांच्याबद्दल जातीवाचक आणि अवमानजनक शब्द वापरणाऱ्या माथेफिरूंवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चर्मकार विकास संघाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.
शनिवार, ५ जुलै रोजी डोंबिवली येथील रहिवासी भूषण पाटील या व्यक्तीने फेसबुक लाईव्हद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मंत्री संजय सावकारे यांच्याबद्दल जातीवाचक अपशब्द वापरून त्यांचा अवमान केला. त्याचबरोबर, येवती, ता. बोदवड येथील चर्मकार समाज बांधव अमोल बाविस्कर यांना उधारीचे पैसे मागितल्यावरून ज्ञानेश्वर पाटील, मंगला पाटील, आणि कमला पाटील या एकाच कुटुंबातील व्यक्तींनी रात्री त्यांना शिवीगाळ करत जातीवाचक शब्दांनी त्यांचा अपमान केला. या दोन्ही घटनांचा चर्मकार विकास संघाने तीव्र निषेध केला असून, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




