जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर काढलेल्या पॉलीसीची मॅच्यूरीटीचे आलेले १० लाख रूपयांची रक्कम एजंटसह इतरांनी परस्पररित्या काढून महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर गुरूवार २७ जून रोजी दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाचाबाई भाईदास पवार वय ४२ रा. मांडवे दिनगर, भुसावळ या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्याचे पती भाईदास छगन पवार यांचे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले. भाईदास पवार यांनी जिवंत असतांना शशिकांत दिलीप बागडे रा. कंजरवाडा यांच्याकडून १० जानेवारी २०१३ रोजी पॉलीसी काढलेली होती. त्यासाठी ते दरवर्षी आकारलेली रक्कम भरत होते. पॉलीसी मॅचुरीटी झाल्यानंतर ११ लाख किंवा मध्ये मयत झाल्यास ११ लाख रूपये मिळणार असे सांगितले होते. दरम्यान भाईदास पवार याचे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे पॉलीसीची रक्कम मिळावी यासाठी लाचाबाई पवार यांनी सर्व कागदपत्र जमा करून बँकेत खाते उघडले. त्यानंतर त्यांच्या खात्यात पॉलीसीचे ११ लाख रूपये १७ जानेवारी २०२४ रोजी जमा झाले. परंतू लगेचच त्याच दिवशी ५ लाख रूपये आणि २५ जानेवारी रोजी १ लाख रूपये अशी रक्कम एजंट शशिकांत बागडे याने IMPSच्या माध्यमातून समृध्दी प्रॉपर्टीज या कंपनीच्या अकाऊंटवर वर्ग केले. आणि १८ जानवोरी रोजी ५ लाख रूपये शशिकांत बागडे याने त्यांच्या ओळखीचे विशाल पाटील यांच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर त्या बँकेत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला. त्यांनी शशिकांत बागडे याला विचारणा केली असता त्याने १ लाख रूपये दिले आणि उर्वरित रक्कम १० लाख रूपये थोड्या दिवसात देण्याचे सांगितले. परंतू अद्यापपर्यंत पैसे दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने गुरूवार २७ जून रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शशिकांत दिलीप बागडे रा. कंजरवाडा, जळगाव, विशाल पाटील आणि समृध्दी प्रॉपर्टीचे खातेधारक यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील हे करीत आहे.