चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी पावसामुळे चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मका, बाजरी, गहू, हरभरा तसेच केळी पिके जमीनदोस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
शुक्रवार, ३ एप्रिल रोजी सकाळी सुमारे दहा वाजता आमदार सोनवणे यांनी वर्डी, गरताड आणि कुरवेल या गावांना भेट देत नुकसान झालेल्या शेतशिवाराचा आढावा घेतला. ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या उपस्थितीत त्यांनी मका, केळी आणि इतर पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. अनेक ठिकाणी पिके पूर्णतः आडवी पडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

कुरवेल येथील जिल्हा परिषद शाळेलाही वादळी पावसाचा फटका बसला असून, आमदारांनी शाळेला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला. शैक्षणिक सुविधांवर परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त गावांमध्ये तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश देताना आमदार सोनवणे यांनी प्रशासनाला पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले. एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, याची विशेष काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना योग्य व त्वरित मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वीजपुरवठ्याच्या नुकसानीबाबत आढावा घेण्यात आला. शहरी तसेच ग्रामीण भागात, विशेषतः कृषी वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
अडावद परिसरातील कवठळ, आगाशे, उनपदेव आणि शेवरा शेतशिवारातही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, येथील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने या भागातही तातडीने मदतकार्य हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे, गट विकास अधिकारी अंजली बर्गे, मुख्याधिकारी रामनिवास झवर, महावितरणचे बोरसे तसेच महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.



