नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून अर्थात वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. प्रथम सुरुवात गुगलने केली होती. नंतर फेसबुक आणि अन्य आयटी कंपन्यांनी देखील धोका टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम सुरू केले.
सुरुवातीला ३ महिने त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांची वाढ दिल्यानंतर देखील करोनाचा धोका कमी न झाल्याने अनेक कंपन्यांनी डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली. गुगलने तर पुढील वर्षी म्हणजे जून २०२१ पर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. जे कर्मचारी घरातून काम करणार आहेत अशांना गुगलने ७५ हजार रुपये (१ हजार डॉलर) देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम घरातून ऑफिसचे काम करताना लागणाऱ्या फर्निचर, इंटरनेट आदी गोष्टींसाठी असल्याचे गुगलने म्हटले होते.
आता गुगलनंतर आता आणखी एका कंपनीने कर्मचाऱ्यांना घरातून काम करताना आवश्यक वस्तू विकत घेण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची घोषणा केली आहे.मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या हाइकने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला ४० हजार रुपये दिले जाणार आहेत.