जळगाव /यावल प्रतिनिधी । जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून ट्रक्टर व टॉलीची चोरी करणारी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यात चौघांना अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी चौघांना यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
संजय तुकाराम धनगर (वय-४२) रा. नरवेल ता. मुक्ताईनगर, कलमी कमरोद्दिन शेख (वय-४२) , प्रमोद सुकदेव महाजन (वय-३८) आणि गणेश वसंत महाजन (वय-३५) रा. आंतुर्ली ता.मुक्ताईनगर असे अटक केलेल्या चारही संशयितांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून आज्ञात टोळी ट्रक्टर व ट्रॉलींची चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी गुन्हयाचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकात सहाय्यक फौजदार विजय पाटील, राजेंद्र पाटील, अशोक महाजन, रविंद्र गायकवाड, वसंत लिंगायत, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, विजय चौधरी, दिपक पाटील, उमेशगिरी गोसावी, किरण चौधरी, योगेश वराडे यांना रवाना केले.
पथक गेल्या सात दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. आज धरणगाव आणि चोपडा तालुक्यात ट्रॉली चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना टोळीचा मोरक्या संजय तुकाराम धनगर (वय-४२) रा. नरवेल ता. मुक्ताईनगर याला धरणगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने , कलमी कमरोद्दिन शेख (वय-४२) , प्रमोद सुकदेव महाजन (वय-३८) आणि गणेश वसंत महाजन (वय-३५) रा. आंतुर्ली ता.मुक्ताईनगर या तीन सहकाऱ्यांची नावे सांगितले. चौघांकडून आतापर्यंत एकुण चोरी केलेल्या ९ ट्रॉल्या आणि १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान चौघांना ट्रॉली किंवा ट्रॅक्टर नाही मिळाली तर घरफोडी किंवा डीपीची चोरी करत असल्याची कबुली दिली आहे. चौघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ट्रॉली चोरी प्रकरणातील चार ही संशयीत आरोपींना यावल न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधिश एन एस बनचरे यांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .