महाराष्ट्र निर्यात संमेलनात उद्योजकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र निर्यात संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्याचे निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या संमेलनात नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालिका वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील लघु व मध्यम उद्योगांना केंद्र व राज्य शासनाच्या निर्यातविषयक योजनांची माहिती देण्यात आली. तसेच निर्यात प्रक्रियेत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ मार्गदर्शकांमध्ये उपनिदेशक हिमांशू पांडे, अंकित दिवेकर, महेश चौधरी, प्रणिता चौरे, सिद्धेश्वर मुंडे, जयेश राणे, आणि तुषार परदेशी यांचा समावेश होता. त्यांनी निर्यात धोरण, प्रक्रिया, आर्थिक सहाय्य, तसेच बाजारपेठेतील संधी यावर सविस्तर माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक उद्योजक या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले. या संमेलनामुळे जिल्ह्यातील उद्योजकांना जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवण्यासाठी प्रेरणा मिळाली असून निर्यातीच्या नव्या संधी शोधण्यासाठी सकारात्मक दिशा मिळाली, असे उपस्थितांनी सांगितले.

Protected Content