गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरूवात सुध्दा झाली आहे. महाराष्ट्रातील विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. काँग्रेसच्या वतीने नागपूर मतदारसंघातून विकास ठाकरे यांनी पहिला उमेदवारी अर्ज भरला आहे. अशातच काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. सध्या काँग्रेसमधील बहूतेक नेते उमेदवारीच्या प्रश्नांवर नाराज होऊन राजीनामा देत आहे. आता यात एक नाव अजून सामील झाला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार नामदेवराव उसंडी यांनी पक्ष सदस्त्वाचा राजीनामा दिला आहे. नामदेवराव उसेंडी हे प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नामदेवराव उसेंडी यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते अशी माहिती मिळत आहे. याआधी उसेंडी यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पण उसेंडी यांचा २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र काँग्रेसने या मतदारसंघातून डॉ. नामदेव किसरसान यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पक्ष सोडताना नामदेवराव उसेंडी म्हणाले की, मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. मला पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन आदिवासी नागरिकांना काँग्रेस पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला. मी गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघातील रहिवीसी आहे. मी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली आहे. आम्हाला 2014 मध्ये मोदी लाटेत सुद्धा 3 लाख मते मिळाली. आम्हाला 2019 मध्ये 4 लाख 42 हजार 442 मते मिळाली. मी 5 वर्षात मेहनत करुन 1 लाख 42 हजार मते वाढवली. त्यानंतर आता आम्ही पक्षाकडे एक दावेदार म्हणून तिकीट मागितलं होतं. पण पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली नाही. पक्षाने काय बघितलं ते मला माहिती नाही. पण अशी चर्चा आहे, पैसावाला आहे म्हणून पक्षाने बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिले.