
पातोंडा ता. अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील चर्मकार समाजबांधवांना संघटित करण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न प्रभावीपणे शासन दरबारी मांडण्यासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अमळनेर तालुका शाखेची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, यामध्ये शिरूड येथील अरुण मोरे यांची तालुकाध्यक्षपदी, तर पातोंडा येथील सागर मोरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

या बैठकीला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी चर्मकार समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करत संघटनात्मक बळकटीवर भर दिला. यावेळी मठगव्हाण येथील प्रविण वाघ आणि गडखांब येथील निवृत्ती बागुल यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व अभिनंदन करून समाजबांधवांनी स्वागत केले.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील चर्मकार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अधिक संघटितपणे कार्य होणार आहे, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला. विविध गावांतील समाजबांधवांनी या कार्यक्रमात हजेरी लावत एकता आणि पुढाकाराचे उत्तम उदाहरण निर्माण केले.
या निवडीमुळे तालुक्यातील चर्मकार समाजात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, नव्या नेतृत्वाकडून आशेने पाहिले जात आहे. समाजाच्या हितासाठी आणि नव्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी ही कार्यकारिणी प्रभावी पावले उचलेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.



