धरणगाव/चोपडा (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीतील घरात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर अक्षयतृतीयेच्या पूर्वसंध्येला टाकलेल्या धाडीत लाखो रुपये गायब झाले होते. तसेच चोपडा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडींचे गुन्हे दाखल केले नव्हते. या संदर्भात ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने वेगवेगळी वृत्त प्रकाशित केली होती. डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी या वृत्तांची गंभीर दखल घेत कुणीही दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज चार कर्मचारी निलंबित केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, डीवायएसपी अग्रवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकाच वेळी चार पोलीस कर्मचारी निलंबित झाल्यामुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
धरणगाव येथील धाडीत तसेच चोपडा शहरातील चार आणि अडावद येथील एक ठिकाणी धाड टाकली होती. येथील रक्कम एसडीपीओ कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनीच ‘शाळा’ भरवित लंपास केल्याचे बोलले जात होते. धरणगावच्या धाडीत घटनास्थळी साधारण १० ते १५ लाखाची रोकड असताना गुन्ह्यात अवघे पावणे तीन लाख कसे दाखवले गेले? उर्वरित रक्कम कुठे गायब झाली? याची माहिती समोर येत नसल्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला होता. परंतू या धाडीतील पैसे कसे गायब झाले? याची सविस्तर माहिती ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने प्रकाशित केली होती. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी चोपडा शहरातील मल्हारपुरा भागातील खाजगी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एका नगरसेवकाच्या येथे धाड टाकल्यानंतर आर्थिक सेटलमेंट करत गुन्हा दाखल केला गेला नव्हता. त्याच पद्धतीने महात्मा फुले नगर,हातेड आणि अडावद येथे धाड टाकून कुठलीही नोंद वजा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. याबाबत देखील ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तात कुठे,किती वाजता धाडी टाकण्यात आल्या, याची सविस्तर माहिती दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार वरील सर्व प्रकरणांची डीवायएसपी श्री.अग्रवाल साहेब यांनी गंभीर दखल घेत,सुटीवरून परत आल्याबरोबर चौकशीला सुरुवात केली होती. त्यानुसार मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांचे जाबजबाब सुरु होते. एवढेच नव्हे तर, आरोप असलेल्या कर्मचारींचे मोबाईल लोकेशन देखील काढण्यात आले होते. शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या मूळ ठिकाणी रवाना करण्यात आले होते. तर बाविस्कर,बेहरे,पारधी आणि साळुंखे नामक कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आल्याचे कळते. या संदर्भात श्री.अग्रवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. दरम्यान, चोपडा डिव्हीजनमध्ये एकाच वेळी चार कर्मचारी निलंबित झाल्याची कदाचित ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे चोपडा,धरणगावसह जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडालेली आहे.