जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील राकेश सपकाळे खून खटल्यातील संशयित आरोपींना मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात तारखेवर हजर करण्यात आले होते. त्याचवेळी सदर खुन खटल्यातील जामीना वरील संशयित आरोपी सोबत असलेल्या चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय-२६) रा. कांचन नगर जळगाव या तरुणाकडे चॉपर आढळून आल्याने सलग दुसऱ्या दिवशी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत संभाव्य धोका टाळण्यात यश मिळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश सपकाळे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून लाडू गँगने हल्ला करून धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. या खून खटल्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा न्यायालयामध्ये तारखेवर हजर केले होते. या ठिकाणी संशयित आरोपींना भेटण्यासाठी काही तरुणांनी गर्दी केली होती. याच वेळेला एका तरुणाकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधित तरुणावर कारवाई करण्यात यश मिळवले. चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय २६, रा. कांचन नगर) या तरुणाकडे चॉपर आढळल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात देण्यात आले. जळगाव शहर पोलीस स्थानकातील गजानन बडगुजर, एलसीबीचे प्रीतम पाटील, विजय पाटील, राजू मेढे, संजय शिवरकर, संतोष मायकल आदींच्या पथकाने ही कारवाई केली.