वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील सुशील नगरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मागील बाजूस असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. या संदर्भात दुपारी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक विलास तायडे (वय-२१ रा. सुशील नगर, वरणगाव ता.भुसावळ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक विलास तायडे हा तरुण आपल्या परिवारासह वरणगाव शहरातील सुशिल नगरात वास्तव्याला आहे. रविवारी ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता त्याने घरात कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेला होता. या संदर्भात त्याच्या नातेवाईकांनी सोमवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानुसार पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. या संदर्भात तपास सुरू असताना मंगळवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मागील बाजूस असलेल्या शिव मंदिराजवळील तलावात दीपक तायडे यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनांसाठी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान तरुणांनी आत्महत्या केली की, तलावात बुडून मृत्यू झाला याची माहिती घेणे सुरू आहे. या संदर्भात वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ यासीन सत्तार पिंजारी हे करीत आहे.