शेत शिवारात कवटी व हाडांचा सांगाडा आढळल्याने खळबळ !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील बोहरा शिवारातील एका कपाशीच्या शेतात रविवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास मानवी कवटी व हाडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंगावरील कपड्यांच्या मदतीने मयताची ओळख पटली असून मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परशुराम पोपट कोळी वय ५५ रा. बोहरा ता.अमळनेर असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे परशुराम कोळी हे व्यक्ती आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. गुरे चारून ते आपला उदरनिर्वाह करत होते. परशूराम कोळी हे ३ ऑक्टोबर २०२४ पासून बेपत्ता होते. त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता. दरम्यान रविवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता बोहरा शिवारातील महेंद्र धनगर यांच्या कपाशी शेतातील बांधावर कवटी आणि हाडे असलेले मृतदेह मिळून आला.

याबाबत मारवड पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलीसांनी अंगावरील कपड्यांवर मयताची ओळख पटविली. नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहे.

Protected Content