अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शालेय जीवनातील गोड आठवणींना पुन्हा उजाळा देत अमळनेर तालुक्यातील प्र. डांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत 1999-2000 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल पंचवीस वर्षांनंतर जुन्या मित्रमैत्रिणींची भेट घडून आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन 26 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले होते. शाळेतील जुन्या वर्गात पुन्हा बसून शिक्षणकाळातील क्षणांचा अनुभव घेणे हीच सर्वांसाठी खास बाब ठरली. 1999-2000 या शैक्षणिक वर्षात एकत्र शिकलेले 42 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 32 विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले. दीर्घ 25 वर्षांनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर मित्रमंडळी एकत्र येणार की नाही याबाबत सुरुवातीला संभ्रम होता; परंतु सर्वांच्या उत्साही सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळीच झळाळी लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी माजी मुख्याध्यापक बी. एस. चौतमल अध्यक्षस्थानी होते. माजी व विद्यमान शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. जुन्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत संवाद साधत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर विविध खेळ, गप्पा, नृत्य आणि सामूहिक फोटोसेशनने संपूर्ण वातावरण रंगले. हास्यविनोदात आणि गप्पागोष्टींमध्ये काळ कसा गेला हे कुणालाच समजले नाही.
स्नेहमेळाव्यादरम्यान 1999-2000 बॅचतर्फे शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे शाळेच्या भिंतीवर शौर्य, प्रेरणा आणि ऐक्याचे प्रतीक उभे राहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुकेश शिसोदे यांनी केले तर आभार प्रदर्शन राकेश पवार यांनी मानले.



