Home Cities यावल फैजपूरमध्ये ५२ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

फैजपूरमध्ये ५२ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । काळाच्या ओघात दूर गेलेल्या शालेय आठवणींना पुन्हा एकदा जिवंत करणारा आणि गुरु-शिष्यांच्या नात्यातील जिव्हाळा अधोरेखित करणारा स्नेहमेळावा फैजपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. आमोदे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित घनःश्याम काशीराम विद्यालयातील १९७८–७९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ५२ वर्षांनंतर आपल्या शाळेत एकत्र येत शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना उजाळा दिला.

या स्नेहसंमेलनाची सुरुवात शाळेच्या गेटमधून बँड पथकाच्या सुमधुर गीतांच्या गजरात वाजत-गाजत, फुलांची उधळण करत करण्यात आली. विद्यालयाचे अध्यक्ष उमेश पाटील, चेअरमन ललित महाजन, उपाध्यक्ष विनायक पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील व कार्यकारिणी संचालकांनी सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक स्वागत केले. अनेक दशकांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताना माजी विद्यार्थी भावूक झाले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेची घंटा वाजवून उपस्थित सर्वांनी राष्ट्रगीत तसेच “खरा तो एकच धर्म” ही प्रार्थना एकत्रितपणे म्हटली. शालेय जीवनातील शिस्त, संस्कार आणि एकोप्याची भावना पुन्हा अनुभवायला मिळाल्याचे अनेकांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.

या स्नेहसंमेलनाचे अध्यक्षस्थान के. एच. पाटील सर यांनी भूषविले. क्रीडा शिक्षक जी. सी. नेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सावधान व विश्राम घेत कार्यक्रमाची औपचारिकता पार पाडली. त्यावेळचे शिक्षक बी. पी. भंगाळे सर व व्ही. टी. जावळे सर यांची उपस्थिती माजी विद्यार्थ्यांसाठी विशेष भावनिक क्षण ठरली.

५२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी शालेय जीवनातील खोडकर आठवणी, शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आपल्या जीवनप्रवासातील अनुभव एकमेकांशी मनमोकळेपणाने शेअर केले. मिठाराम सरोदे, रवींद्र पाटील, सुनील महाजन, अरुण पाटील यांनी आपल्या आठवणी सांगत त्या काळातील शाळेचे दिवस डोळ्यांसमोर उभे केले.

घनःश्याम काशीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव बोठे सर यांनी आपल्या मनोगतात शाळेची वाटचाल, शैक्षणिक गुणवत्ता व आजच्या घडीला राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. साधारण ६२ ते ६५ वयोगटातील हे सर्व विद्यार्थी आजही शाळेप्रती तितकेच आपुलकीचे असल्याचे दिसून आले.

या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिठाराम सरोदे, मनोहर पाटील, निवृत्ती लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. हा मेळावा केवळ भेटीपुरता मर्यादित न राहता, मैत्री, कृतज्ञता आणि संस्कारांची उजळणी करणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.

एकूणच, ५२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या गुरु-शिष्य आणि वर्गमित्रांच्या या स्नेहसंमेलनाने शालेय जीवनातील नात्यांची घट्ट वीण अधोरेखित करत सर्वांच्या मनात गोड आठवणींचा ठेवा निर्माण केला.


Protected Content

Play sound