आता काँग्रेसला ‘नो चिंता’ : संतोषभाऊ चौधरी समर्थकांसह प्रवेश घेण्याचे संकेत !

भुसावळ-इकबाल खान । माजी आमदार संतोषभाऊ चौधरी हे आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून यामुळे स्थानिक राजकारणात अजून एक मोठा टर्न येण्याची शक्यता आहे.

माजी आमदार तथा माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संतोषभाऊ छबीलदास चौधरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात शिवसैनिक म्हणून केली होती. शिवसेनेच्या माध्यमातूनच ते नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. अतिशय महात्वाकांक्षी असणाऱ्या संतोष चौधरी यांनी शिवसेनेत आपल्याला भविष्य नसल्याचे हेरून 1999 साली राष्ट्रवादीत प्रवेश केला. येथून त्यांनी शहरासह मतदारसंघाच्या राजकारणात मोठी भूमिका पार पाडली. 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाल्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला. यानंतरही ते नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रीय होते.

दरम्यान, 2016 साली त्यांनी आपले पुत्र सचिन चौधरी यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले असता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर गेल्या आठ वर्षात त्यांना थेट कोणतेही पद मिळाले नाही. ते शहर व मतदारसंघाच्या राजकाणात परिघावर फेकले गेले. मध्यंतरी त्यांनी शरद पवार गटाच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. तथापि, त्यांच्या ऐवजी श्रीराम पाटील यांना तिकिट मिळाल्यानंतर ते नाराज झाले होते. येथूनच ते वेगळा मार्ग निवडणार असल्याची चर्चा झाली होती.

या पार्श्वभूमिवर, संतोषभाऊ चौधरी आणि त्यांचे समर्थक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सहभागी होण्याची चाचपणी करत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली असून यातच संतोषभाऊंच्या प्रवेशाची चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता भुसावळ शहर आणि विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Protected Content