कराड । माजी मंत्री तथा काँग्रेसचे मातब्बर नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे उपचार सुरू असतांना निधन झाले. त्यांनी दक्षीण कराड मतदारसंघातून तब्बल सात वेळेस विजय संपादन करून विविध खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
मागील काही दिवसांपासून विलासराव पाटील-उंडाळकर ( वय 85 वर्षे ) यांचे प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मूळचे उंडाळे (तालुका कराड) गावचे रहिवासी असलेल्या विलासराव पाटील उंडाळकर यांनी 1967 झाली राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सलग 35 वर्ष त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते.
2014 साली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी अपक्ष निवडणूक लढवणार या विलासराव पाटील-उंडाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेपासून फारकत न घेता आपली तत्वे विचार आणि निष्ठा कायम ठेवले होती. तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रीय काँग्रेस बळकट करण्यासाठी सर्व मतभेदांना तिलांजली देत विलासराव पाटील उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे जिल्ह्यातील दोन्ही नेते एकत्र आले होते.
राजकीय कारकीर्दीत त्यांनी 12 वर्षे विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळून महाराष्ट्राच्या जडणघडणीला हातभार लावला. उंडाळकर यांचे सहकारी क्षेत्रातही मोठे काम आहे. राजकीय जीवनात त्यांनी अनेक सहाकरी संस्था उभारल्या.