लंडन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दोन दशकापूर्वी नोकरीसाठी केरळमधून ब्रिटनमध्ये गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याने ब्रिटनच्या निवडणुकीत इतिहास घडविला आहे. मुळचे केरळचे नागरिक असलेल्या सोजन जोसेफ यांनी मजूर पक्षाकडून निवडणूक लढवित दिमाखदार विजय मिळविला. ॲशफोर्ड या हुजूर पक्षाच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढवत असताना जोसेफ यांनी हुजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते डॅमियन ग्रीन यांचा पराभव केला.
या विजयानंतर ब्रिटनच्या संसदेत प्रवेश करणारे सोजन जोसेफ हे पहिलेच केरळचे रहिवाशी ठरले आहेत. केरळचे कोट्टयम शहर हे नर्सिंग व्यवसायाचे प्रमुख केंद्र मानले जाते. कोट्टयममधूनच दोन दशकापूर्वी जोसेफ नोकरीसाठी ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झाले होते. मजूर पक्षाकडून निवडणूक लढवत असताना त्यांनी १३९ वर्षांनंतर ॲशफोर्ड येथे मजूर पक्षाचा झेंडा फडकवला आहे. शतक भरापासून या मतदारसंघावर हुजूर पक्षाचा बोलबाला होता.