नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सीबीआयने ६ एप्रिल रोजी अटक केली होती. अनिल देशमुख यांना नुकतेच उच्च रक्तदाब आणि छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या न्यायालयीन तुरुंगात आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वतीने २५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु याची सुनावणी होत नसल्याने अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, देशमुख हे ७३ वर्षांचे आजारी वृद्ध असून त्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा व त्यांचा संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. असा युक्तिवादही करण्यात आला.
यावर जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यास सांगितले असून मुंबई उच्च न्यायालय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज जलदगतीने निकाली काढेल अशी आम्हाला आशा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आज सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करत उच्च न्यायालयाला या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यास सांगितले आहे.