चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तीन दिवसांपूर्वी टोळक्याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले येथील माजी नगरसेवक महेंद्र (बाळू ) मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, ७ फेब्रुवारी रोजी चाळीसगावात गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. यात एका कारमधून आलेल्या टोळक्याने माजी नगरसेवक महेंद्र ( बाळू ) मोरे हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता. यानंतर हे टोळके कारमधून पळून गेले होते.
सदर घटना घडताच माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र उपचार सुरू असतांना रात्री उशीरा त्यांनी शेवटचा श्वास घेतला. चाळीसगाव पोलीस स्थानकाच सहायक पोलीस निरिक्षक विशाल टकले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
दरम्यान, या प्रकरणी आधीच हल्ला करणारे पाच आणि कट रचणारे दोन अशा सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचे उपचार सुरू असतांना निधन झाल्याने या प्रकरणी खुनाचे कलम लावण्यात येणार आहे. तर, बाळू मोरे यांच्या निधनाचे वृत्त येताच परिसरावर शोककळा पसरली असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.