यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा गावातील सार्वजनिक ठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी मतदान यंत्रणाचे (ईव्हीएम मशीन) नागरिकांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिंगोणा गावातील वॉर्ड क्रमांक 1 ते 5 या प्रभागामधील ग्रामस्थांना निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रणेबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. याचबरोबर मतदान यंत्रणेविषयी होत असलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी गावात ठिकठिकणी प्रशासनाच्या वतीने बुथ लावण्यात येत आहे. तसेच तलाठी कर्मचा-यांकडून ही माहिती देण्यात येत आहे. यात हिंगोणा ग्रामपंचायत परिसर, डोंगर हाळ परिसर, मस्जिद चौक, तडवी वाडा येथे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी आर.डी.पाटील मंडळ अधिकारी भालोद, डी.एच.गवई तलाठी हिंगोणा शरद पाटील तलाठी सांगवी, एन.जे.धांडे, तलाठी अट्रावल गोपाळ भगत, तलाठी भालोद सुमन हर्षल, आंबेकर कोतवाल यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी मोठया प्रमाणावर आपली उपस्थित नोंदवुन मतदान यंत्रणेविषयी असलेल्या शंका गैरसमज यासंदर्भातील माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडुन काढुन घेतली. प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीदार आर.के.पवार, राहुल महाजन तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या सहाय्याने यावल सर्कलमध्ये १० दिवस आणि तालुक्यातील इतर गावामध्ये या ईव्हीएम यंत्रणा, व्हीव्हीपॅट विषयी युद्धपातळीवर ही जनजागृती मोहीम राबण्यात येत आहे. या मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.