Home राजकीय सर्व काही उद्ध्वस्त… एका शब्दातून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली भावना

सर्व काही उद्ध्वस्त… एका शब्दातून खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली भावना


बारामती-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरवणारी घटना बारामतीत घडली असून उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेतृत्वासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांचे भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ पवार कुटुंबच नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले असून, खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या भावना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांना जबर धक्का बसला आहे. बारामतीत वातावरण पूर्णपणे शोकमय झाले असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर अनेकांच्या तोंडातून शब्दही निघेनासे झाले आहेत. पवार कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या आघातामुळे बारामतीकरांना पोरके झाल्यासारखे वाटत आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप स्टेटस समोर आले असून, त्यातून त्यांच्या मनातील वेदना स्पष्टपणे दिसून येत आहेत. ‘Devastated’ म्हणजेच ‘उद्ध्वस्त’ हा एकच शब्द त्यांनी स्टेटसमध्ये लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. एका शब्दातच त्यांनी स्वतःचे, पवार कुटुंबाचे, राष्ट्रवादी पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे किती मोठे नुकसान झाले आहे, हे अधोरेखित केले आहे.

आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमानाचा तोल गेला आणि ते शेजारच्या शेतात कोसळले. अपघातानंतर काही क्षणांतच विमानाला भीषण आग लागली आणि एकामागोमाग एक स्फोट झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी, दोन पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाने लँडिंगपूर्वी एक फेरी मारली होती, मात्र दुसऱ्या फेरीदरम्यान मोठा आवाज येऊ लागला आणि काही क्षणांतच स्फोटाचा आवाज झाला. स्फोटांमुळे कुणालाही तातडीने मदतीसाठी पुढे जाता आले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी या घटनेच्या वेळी दिल्लीत होत्या. सकाळीच ही वार्ता कळताच त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. लाडक्या दादाच्या अकाली जाण्याने सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला असून त्यांचा शोक अनावर झाल्याचे त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरून स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबाचा मोठा आधारवड असलेले अजित पवार अशा प्रकारे अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांना हा आघात सहन करणे कठीण झाले आहे.

अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा वयाने मोठे असून, राजकारणातही दोघांनी अनेक वर्षे एकत्र काम केले होते. आपला हक्काचा, लाडका दादा अचानक सोडून गेल्याने त्यांचे मन सैरभैर झाले आहे. एका शब्दातून त्यांनी व्यक्त केलेली वेदना ही संपूर्ण महाराष्ट्राच्या भावनांचेच प्रतिबिंब ठरत आहे.

दरम्यान, बारामती येथील रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून अनेकजण आक्रोश करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound