भुसावळ (प्रतिनिधी) योग विद्या ही आपल्या देशाची महान संस्कृती आहे. हा ठेवा आपण जपायला हवा. योगाने केवळ शारीरीकच नव्हे तर मानसिक आरोग्य देखील उत्तम राखता येत असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. रजनी संजय सावकारे यांनी आज (दि.२०) येथे केले.
त्या योग दिनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने जगातील ६० टक्के देश नियमित योग साधना करीत आहेत. मग आपल्या देशाने आणि शहरानेही यात सहभाग घ्यावा, म्हणुन शहरातील सर्व संघटना ‘आर्ट ऑफ लिव्हींग’च्या मार्गदर्शनाखाली अद्वैतानंद योगा अॅन्ड फिटनेस स्टुडिओ, प्रतिष्ठा महिला मंडळ, क्रीडा संघटना, पत्रकार संस्था, महसुल, पोलिस असे सगळे यात सहभागी होणार आहेत. सुमारे ६०० नागरिक यावेळी योगासाठी उपस्थित राहणे अपेक्षित असुन वेळेवर येणाऱ्यांनाही प्रवेशिका देण्यात येणार आहेत. वयाची अट नसल्याने जास्तीत जास्त साधकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा सौ.सावकारे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, पालिकेचे अटल बिहारी वाजपेयी उद्यान हे ग्रीन स्पेस योजनेअंतर्गत विकसीत करण्याचे काम सुरु आहे. ११ एकराचा हा परीसर हिरवागार आहे, येथील आल्हाददायक वातावरण हे योगास उत्तम असुन आगामी काळात हे उद्यान पुणे मुंबईच्या धर्तीवर आपल्या शहरासाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.