अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक : पोलीस अधिक्षक डॉ. उगले

जळगाव (प्रतिनिधी) अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी व्यक्त केले.

 

जिल्हा स्कुलबस समितीची बैठक पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात डॉ. उगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. जे. पाटील, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर यांच्यासह स्कुलबस असोसिएशनचे पदाधिकारी, शालेय संस्था व विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना डॉ. उगले म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन, स्कुलबस असोसिएशन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने स्कुलबस धोरण 2011 जाहिर केले आहे. यानुसार प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली स्कुलबस समिती गठीत करणे आवश्यक आहे. ज्या शाळांनी अद्याप समिती गठीत केली नसेल त्यांनी तात्काळ गठीत करावी. या समितीच्या दर तीन महिन्याला बैठका घेणे आवश्यक असल्याचेही डॉ उगले यांनी बैठकीत सांगितले.

 

मुख्याध्यापकांना आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी कशाप्रकारे शाळेत येतो. शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी झालेली आहे काय. त्याचबरोबर इतर बाबींची तपासणी करण्याकरीता शासन धोरणात शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व शाळांनी कार्यवाही करणेआवश्यक आहे. अन्यथा अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही डॉ उगले यांनी दिला. विद्यार्थी हा आपल्या कुटूंबाचा घटक आहे असे समजून विद्यार्थी वाहतुक करणारे वाहनचालक, स्कुलबस समिती असोसिएशन, शाळा व्यवस्थापन यांनी नेहमी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहनही डॉ. उगले यांनी केले.

 

शालेय विद्यार्थ्यांना स्कुलबसमधून उरवितांना तसेच चढवितांना वाहतुकीला अडथळा होता कामा नये. याकरीता वाहने रस्त्यावर न लावता ती शाळेच्या प्रांगणातच लावावी. स्कुलबसमध्ये अग्निशामक उपकरण, प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. तसेच चालकाला त्याचा नावाचा बॅच असणे आवश्यक आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत शाळा व्यवस्थापनांने शाळेच्या गेटवर दोन वॉर्डन ठेवणे आवश्यक आहे. स्कुलबस असोसिएशनने चालकांची नेमणूक करतांना त्यांची संपूर्ण माहिती करुन घ्यावी, चालक र्निव्यसनी असावा, त्याचेकडे वाहन चालविण्याचा परवाना असावा. वाहतुक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करु नये. विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना वाहतुक परवाना असणे आवश्यक आहे. ज्या वाहनांकडे असा परवाना नसेल त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी बैठकीत सांगितले.

 

उत्कृष्ट शाळा/उत्कृष्ट चालकांचा होणार गौरव

 

ज्या शाळा व विद्यार्थी वाहतुक करणारे वाहनचालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतील. तसेच वाहतुक नियमांचे पालन करतील. त्यांना वाहतुक सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमावेळी उत्कृष्ट शाळा / उत्कृष्ट चालक म्हणून गौरविण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. उगले यांनी बैठकीत दिली. याबाबत शिक्षण विभाग तसेच शहर वाहतुक शाखा यांनी पालक, शाळा व्यवस्थापन वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची सुचनाही डॉ. उगले यांनी केली.

 

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्कुलबस असोसिएशनच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विभागाशी संबंधित अडचणीवर सामंजस्याने तोडगा काढण्यात येईल. तथापि, सर्वांनी वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उभयतांनी उपस्थितांना केले.

Protected Content