जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रत्येक महिलेनं शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी योग, सूर्यनमस्कार आणि नियमित व्यायामाचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं.त्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “मानसिक आणि शारीरिक आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल उपस्थित होत्या. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील या प्रसंगी मंचावर उपस्थित होते.

मीनल करनवाल पुढे म्हणायला की, परिपूर्णतेच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक असल्याचे त्या महिलांना आत्मकाळजी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. “महिलांनी आत्मविश्वास, निश्चय आणि सकारात्मकता यांचा स्वीकार केला, तर यश त्यांच्यापासून दूर राहणार नाही,” असे करनवाल यांनी स्पष्ट केले. तसेच मीनल करनवाल यांनी महिलांच्या दैनंदिन आयुष्यात व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, “मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ध्यान आणि योगा अत्यावश्यक आहे. आधुनिक काळात आव्हाने अनेक असतात, पण आत्मविश्वासाने त्यांना सामोरे गेल्यास कुठलेही संकट मोठे राहत नाही.” त्यांनी पोलिस दलातील महिलांच्या कार्यक्षमता आणि सहनशीलतेचे कौतुक केले.
कार्यशाळेच्या समारोप सत्रात पोलीस उपनिरीक्षक भारती काळे आणि कॉन्स्टेबल विद्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले, तर आभार पोलीस हवालदार अश्विनी निकम यांनी मानले.



