चाळीसगाव (प्रतिनिधी) महिलांना समाजामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, प्रत्येक महिलेने आपल्या हक्कांविषयी जागरूक राहणे गरजेचे असून अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाविरोधात पुढे येणे महत्त्वाचे आहे. ‘पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेच्या जोखडातून मुक्तीचा लढा महिलांनी वैचारिक ताकतीने लढला पाहिजे, महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे, शिक्षण घेतले पाहिजे. त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. राज्य महिला आयोगानं तीन वर्षात अनेक राष्ट्रीय परिषदा घेऊन ग्रामीण भागापर्यंत महिलांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा नेहमी महिलांच्या हक्कासाठी त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन चाळीसगाव महाविद्यालयातील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांनी केले.
बी.पी. आर्टस् ,एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज व महाराष्ट्र राज्य महिला आयोग ,मुंबई यांचे सहयोगाने दि. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी “महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण अंतर्गत महिलांमध्ये करावयाची सामाजिक व कायदेविषयक जागृती या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे यांच्या शुभ हास्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चा.ए. सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल होते. व्यासपीठावर पोपट भोळे (सभापती शिक्षण समिती जि.प. जळगाव), सौ.स्मिता बोरसे (सभापती पं.स चाळीसगाव), सौ. आशालता विश्वास चव्हाण नगराध्यक्ष चाळीसगाव, शुभदा ठाकरे धुळे, श्री. देवरे माजी प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, मिलिंद देशमुख, विनोद कोतकर, स्मिताताई बच्छाव, संपदा पाटील, दादासाहेब बुदेलखंडी, प्रदीप अहिरराव, क.मा.राजपूत इ. उपस्थित होते. प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक परिषदेचे प्रमुख डॉ.डी.एस. निकुंभ यांनी केले.
या वेळी श्रीमती अनिता गिरडकर न्यायाधीश यांनी आपल्या भाषणात म्हटले की, महिलांसोबत पुरुषांमध्ये सुद्धा जागृती होणे गरजेचे आहे, समाजातील सर्वच पुरुष वाईट नाही पण विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक महिलेला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. कायद्याची व्याप्ती मोठी आहे. जेव्हा २२-२३ वयाची मुले-मुली घटस्फोटासाठी येतात, तेव्हा वाटते की, कुठे भरटकतो आहे समाज, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. त्यांनी महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांचे सविस्तर माहितीही यावेळी सांगितली. अध्यक्षीय मनोगतात नारायण अग्रवाल म्हणाले की, महिलांनी मानसिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे. महिलांनी शिक्षण घेतले, त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या तर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, ‘सुशिक्षित महिलांनी हिंसा आणि अत्याचारांविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन अश्या कार्यशाळेचा पूर्ण दिवस थांबून माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंगापूरकर व प्रा. रवींद्र पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले.