यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयात शासकीय आदिवासी दिनानिमित्त शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास आदिवासी आश्रम शाळेचे विध्यार्थी-विध्यार्थीनी आदिवासी बांधवांच्या पारंपारिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजीक क्षेत्रासह शासकीय अधिकारी,आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे. याशिवाय आदिवासी तडवी भिल्ल जमात दरवर्षा प्रमाणे या वर्षी देखील जागतिक आदिवासी गौरव दिना निमीत्त आदिवासी तडवी भिल्ल जमात कडून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावल शहरातील विस्तारित वसाहतीमधील तडवी कॉलनीतून आदिवासी समाज बांधवांच्या पारंपारिक नृत्य व सजीव देखाव्यांचा सवाद्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. दरम्यान धनश्री चित्र मंदिरात ही मिरवणूकीची सांगता होईल. याशिवाय यावल तालुक्यातील अनेक आदिवासी समाजसेवी संघटनांनी मिरवणूकीचे आयोजन केले आहे.