अमळनेर (ईश्वर महाजन)
बाई मी मीठ मिरची वाटत आहे,
माझ्यासंगे पाटाही कण्हत आहे…
पुरे झाली तुझी नवी आश्वासने,
मी दुःखातही सुखाने जगत आहे…
या ओळींचा प्रत्यय देणार्या या माऊलीच्या कष्टाची कहाणी आजच्या काळात पाहिल्यावर खरंच म्हणावेसे वाटते की, अजूनही या उपेक्षितांच्या जीवनाची दैना संपलेली नाही.काळानुरूप समाज बदलत गेला. घराघरांत आधुनिक साधनांचा वापर वाढून दैनंदिन जगण्यातले कष्ट कमी झालेत. पण तरीही आज यांच्या कष्टमय जीवनाला विश्रामाचा आधार मिळालेला दिसत नाही. धनुर्धारी एकलव्याचे वारस असलेले हे वन बंधू-भगिनी आजही पाटा-वरवंट्यावर मिरचीमसाला वाटताना दिसले की, या कष्टकरी समाजाचे कष्ट त्यांना जळवासारखे शोषित आहेत याचा प्रत्यय येतो.
महाराष्ट्रात आदिवासी समाजाच्या एकूण ४७ जमाती आहेत. त्यापैकी २०११ च्या जनगणनेनुसार भिल्ल, गोंड, महादेव कोळी, वारली, कोकणा आणि ठाकूर यांची एकत्रित संख्या महाराष्ट्रातील एकूण आदिवासींच्या ७३ टक्के एवढी आहे. हा समाज खूप मेहनती आहे, परंतु समाजाच्या मुख्य धारेपासून वंचित राहिल्याने अपेक्षित प्रमाणात त्यांचा विकास झालेला नाही. आदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो, आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर त्यांचा उत्सव सुरू असतो. जगाचा निरोप घेतानाही जन्माबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव ते जपतात. या परंपरेचा पगडा आजही बहुतांशी आदिवासी समाजावर कायम आहे.
महिलांचा आजही मांसाहारी अन्न खाण्याकडे जास्त कल असतो. एकीकडे समाजाची प्रगती होत असताना ग्रामीण भागातील बऱ्याच चालीरीती लोप पावल्या असल्या तरी भिल्ल समाजातील महिला आजही पाटा-वरवंट्यावर मिरची मसाला वाटताना दिसतात. आजही ही प्रथा या समाजामुळे जिवंत आहे, कारण या पाटा-वरवंटयावर मिरची मसाला करून केलेली कोणतीही भाजी किती चविष्ट असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
माणसाचे संसारी जीवन सुखी व आनंदी होण्यासाठी कौटुंबिक प्रश्नावर मात करणे गरजेचे असते. कुटुंब व्यवस्था मग ती एकत्र असो वा विभक्त ती सावरण्याची गरज असते. त्यासाठी आपल्या गरजा माणसाने कमी केल्या तर पैशांच्या मागे त्याला धावावे लागणार नाही. मग कुटुंबासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ असेल. एकीकडे आदिवासी भिल्ल समाज आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र राहून, मिळेल ते काम करून आनंदी जीवन जगताना दिसतो. उद्या काय होईल ? याची चिंता न करता आजचा दिवस कसा चांगला जाईल ? एवढेच बघणे, हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यांच्याकडून आधुनिक समाजाने बऱ्याच गोष्टी शिकणे आणि त्यांचे अनुकरण करणे गरजेचे आहे.