जालना-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | मराठ्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घरी बसू नये. 20 तारखेपासून सगळ्यांनी आंतरवेलीतून पायी निघायचे आहे. मुंबईला जाण्यासाठी मराठे मुंग्यासारखे घराबाहेर पडतील आणि सरकारने गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आम्ही लोकांच्या योजनेप्रमाणे रात्र दिवस चालून मुंबई गाठणार आहोत. आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. पन्नास टक्क्यावरचे आरक्षण तरी टिकणार आहे का ? आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. भविष्यात मराठ्यांच्या मुलांचे हाल होणार आहे. तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी लेकरांना दिली आहे. तसेच आयुष्याचे आरक्षण त्यांना देण्यासाठी मराठ्यांनी घराबाहेर पडायलाच हवे असेही त्यांनी म्हटले आहे. प्रकाश शेडगे यांनी इकडे तिकडे शक्ती वापरण्यापेक्षा धनगरांना आरक्षण मिळावे यासाठी शक्ती वापरावी असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.