मतदानापूर्वीच आयोगाने जप्त केले चार हजार ६५० कोटी रूपयांचे ड्रग, रोख रक्कम जप्त

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । देशभरात सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच, देशातील ७० वर्षांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वाधिक प्रमाणातील जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी बेकायदा मार्गांचा वापर करणाऱ्यांविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलले असून लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वीच आतापर्यंत चार हजार ६५० कोटी रुपये किमतीची जप्ती केली आहे. यात रोख रक्कम, अमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू आणि मतदारांना वाटण्यासाठीच्या मोफत वस्तूंचा समावेश आहे.

या कारवाईत सर्वाधिक मोठी कारवाई राजस्थानमध्ये करण्यात आली असून या राज्यात ७७८ कोटी रुपये किमतीच्या वस्तू किंवा अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर गुजरात राज्यातही ६०५ कोटी रुपयांची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागत असून महाराष्ट्रात या कारवाईतून ४३१ कोटी रुपयांचे पदार्थ व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत महाराष्ट्रातही ४३१ कोटी रुपये किमतीचे रोख रक्कम, अमलीपदार्थांची जप्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात झालेल्या कारवाईत ४० कोटी पाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात ३५ लाख ५६ हजार लिटर दारूचा साठा जप्त करण्यात आला असून या साठ्याची बाजारातील किंमत २८ कोटी ४६ लाख एवढी आहे. त्याचप्रमाणे २१३ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय ६९ कोटी ३८ लाख रुपयांचे सोने किंवा मौल्यवान वस्तू तसेच ७९ कोटी ८७ लाख रुपयांच्या मतदारांना आमिष दाखविण्यासाठी साठा केलेल्या वस्तूही महाराष्ट्रातून जप्त करण्यात आल्या आहेत.

वर्ष २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जप्त करण्यात आलेल्या एकंदर तीन हजार ४७५ कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळी जप्तीच्या रकमेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच आयोगाने केलेल्या जप्तीमध्ये ४५ टक्के अमलीपदार्थ आहेत. सर्वसमावेशक नियोजन, विविध सरकारी संस्थांदरम्यान सहकार्य, एकीकृत प्रतिबंधक कारवाई, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जप्तीची कारवाई शक्य झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

देशाच्या विशिष्ट भागांमध्ये राजकीय निधीशिवाय मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा होणारा वापर, यामुळे निवडणुकीची लढत बहुतांश संपन्न राजकीय पक्ष किंवा उमेदवारांसाठी अनुकूलतेकडे झुकल्याने समान संधी राहत नाही. आयोगाकडून केली जाणारी जप्ती म्हणजे विविध प्रलोभनेमुक्त आणि निवडणुकीतील चुकीच्या पद्धतींपासून मुक्त वातावरणात निष्पक्षपणे सुनिश्चित पद्धतीने लोकसभा निवडणूक घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्धाराचा महत्त्वाचा भाग आहे. या लोकसभा निवडणुकीत वाढीव प्रमाणात झालेली जप्ती, विशेष करून छोट्या तसेच कमी साधनसंपत्ती असलेल्या राजकीय पक्षांना समान संधी देण्यासाठी प्रलोभनांवर लक्ष ठेवणे आणि निवडणुकीत होऊ शकणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत ३९५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. याशिवाय ४८९ कोटी रुपयांची दारू, २०६८ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ, ५६२ कोटी रुपयांचे सोने किंवा मौल्यवान वस्तू तर ११४२ कोटी रुपयांच्या अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

Protected Content