दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाच्या काळात नागरिकांना तातडीने सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी पीएम केअर फंडाची सुरुवात करण्यात आली होती. २०२० मध्ये हा पीएम केअर फंड सुरु करण्यात आला होता. त्यानंतर २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीत देखील या फंडात सरकारी आणि खासगी कंपन्यांनी भरभरुन मदत केली. पीएम केअर्स फंडासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षातही तब्बल ९१२ कोटी रुपये मिळाले आहेत, म्हणजे कोरोना महामारीनंतरही पीएम केअर्स फंडसाठी देणग्यांचा ओघ सुरूच असल्याचं यावरून दिसून येत आहे.
पीएम केअर फंडसाठी २०२२-२३ या दरम्यान ऐच्छिक योगदान म्हणून ९०९.६४ कोटी रुपये आणि परदेशी योगदान म्हणून २.५७ कोटी रुपये मिळाले आहेत. ९१२ कोटी रुपयांच्या देणग्यांव्यतिरिक्त पीएम केअर फंडाला व्याज उत्पन्न म्हणून १७०.३८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी १५४ कोटी नियमित खात्यांवरील व्याज आणि १६.०७ कोटी विदेशी खात्यातून मिळालेले आहेत. केंद्र व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी चालवल्या जाणाऱ्या सरकारी रुग्णालयांना ५०,००० मेड इन इंडिया व्हेंटिलेटरच्या खरेदीतून परतावा आणि २०२ कोटींसह विविध स्त्रोतांकडून सुमारे २२५ कोटी रुपये परताव्याच्या स्वरूपात मिळाले आहेत.यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
देयके आणि वितरणाबाबत पीएम केअर फंडाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ४३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मुलांसाठी पीएम केअरवर ३४६ कोटी रुपये तर ९९,९८६ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या खरेदीसाठी ९१.८७ कोटी रुपये तर कायदेशीर प्रक्रियासाठी २४,००० रुपये. तसेच आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरीस पीएम केअर्स फंडातील क्लोजिंग बॅलन्स ६,२८४ कोटी रुपये होते. जे २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ५,४१६ कोटी रुपयांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी जास्त होते. २०२२-२१ च्या शेवटी ७,०१४ कोटी रुपये आणि २०१९-२० च्या अखेरीस ३,०७७ कोटी रुपये शिल्लक राहिले होते. एकूण २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षांत पीएम केअर फंडाला एकूण १३,६०५ कोटी रुपये मिळाले. ऐच्छिक योगदान १३,०६७ कोटी आणि परदेशी योगदान ५३८ कोटी रुपये आणि या कालावधीत व्याज उत्पन्न म्हणून ५६५ कोटी रुपये मिळाले.