राज्यात एप्रिलपासून ईव्हीच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने सादर केलेल्या नवीन अर्थसंकल्पात ईव्ही सेगमेंटमधील गाड्यांवर 6% मोटार व्हेईकल टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर हा कर लागू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे अनेक लक्झरी इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या कंपन्यांच्या ईव्ही गाड्या महागणार आहेत आणि किती फरक पडणार आहे.

चिनी ऑटोमोबाईल कंपनी BYD द्वारे विकली जाणारी BYD Seal इलेक्ट्रिक सेडान सध्या 41 लाख ते 53 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. नवीन करामुळे या गाडीची किंमत महाराष्ट्रात सुमारे 3.18 लाख रुपयांनी वाढणार आहे. याशिवाय, Sealion आणि Atto 3 या गाड्यांचेही दर वाढणार आहेत. दक्षिण कोरियन कार उत्पादक ह्युंदाई ही कंपनी भारतीय बाजारात Hyundai Ioniq 5 ही लक्झरी इलेक्ट्रिक कार विकते. सध्या या गाडीची एक्स-शोरूम किंमत 46.05 लाख रुपये आहे. महाराष्ट्र सरकारच्या नवीन करामुळे याची किंमत 3 लाख रुपयांनी वाढू शकते.

Kia ही कंपनी भारतीय बाजारात EV6 मॉडेल विकते, ज्याची एक्स-शोरूम किंमत 60.96 लाख ते 65.96 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. नवीन मोटार व्हेईकल टॅक्स लागू झाल्यानंतर, या गाडीच्या किंमतीत 4 लाख रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. BMW कंपनीच्या iX1 LWB इलेक्ट्रिक कारची सध्या एक्स-शोरूम किंमत 49 लाख रुपये आहे. नवीन टॅक्स लागू झाल्यानंतर या गाडीच्या किंमतीत सुमारे 3 लाख रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

लक्झरी कार निर्माता Mercedes-Benz ची EQA इलेक्ट्रिक कार सध्या 67.20 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. महाराष्ट्रात नवीन कर लागू झाल्यानंतर, या गाडीची किंमत 4 लाख रुपयांनी वाढणार आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी हा निर्णय मोठा धक्का ठरणार आहे. केंद्र सरकारकडून ईव्ही खरेदीसाठी विविध सबसिडी दिल्या जात असल्या तरी, महाराष्ट्र सरकारच्या या नव्या टॅक्समुळे प्रीमियम ईव्ही खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

Protected Content