जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबर, २०२१ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे प्रवाशांच्या सोयीकरीता नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.
नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. ०२५७-२२६१८१९ असून प्रवाशांना वाहनाची उपलब्धता किंवा मागणी असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधून मागणी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर शासकीय अधिसूचनेनुसार खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहनाव्दारे प्रवासी वाहतूक करण्याकरीता मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बसेस उपलब्ध करुन देण्यासाठी परिवहन कार्यालयातील सहा. मोटार वाहन निरीक्षक/ मोटार वाहन निरीक्षक यांची बस स्थानकनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने जळगाव शहर जुने व नवे बस स्थानक, भुसावळ बस स्थानक, चाळीसगाव बस स्थानक व अमळनेर बस स्थानक या ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच सर्व बस स्थानकांवर प्रवाशांच्या गरजेनुसार स्थानिक ठिकाणचे स्कूलबस वाहतूकदार, खाजगी बस वाहतूकदार किंवा मालवाहू वाहतूकदार यांचेशी संपर्क साधून वाहने उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहतूक संघटना व मालवाहतूक संघटना पदाधिकाऱ्यांनी सणासुदीच्या दिवसात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहने उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहनही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.