जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या वतीने मेहरुण येथील श्रीराम माध्यमिक विद्यालयात विशेष कार्यक्रम व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे जीवनातील महत्व समजावून देत या कार्यक्रमातून विधी सेवा प्राधिकरणाने जनजागृतीचा संदेश दिला.

मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व एम. क्यु. एस. एम. शेख, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांच्या आदेशान्वये हा कार्यक्रम पार पडला. सचिव श्री. पवन एच. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता श्रीराम माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे विद्यार्थ्यांसाठी शिक्षणविषयक उपक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी श्री. पवन बनसोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनात शिक्षणाचे महत्व आणि त्यातून घडणारी व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षण हे केवळ शालेय विषयापुरते मर्यादित नसून, जीवनमूल्ये, विचारशीलता आणि जबाबदार नागरिकत्व विकसित करणारे साधन असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी “शिक्षणाचे अधिकार आणि शिक्षणाचे जीवनातील महत्व” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपले विचार मांडले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवृत्ती आणि लेखनकौशल्य वृद्धिंगत झाले.
श्रीराम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील स्थान यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका श्रीमती प्रतिभा पाटील यांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी प्रमोद बी. ठाकरे, संतोष एस. तायडे आणि सचिन पवार (कंत्राटी शिपाई) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.



