एरंडोल प्रतिनिधी । अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यालय, गुरुकुंज आश्रम, मोझरी (जि.अमरावती) संचलित जळगाव येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ या सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या मिनाक्षी चंद्रकांत पाटील, नीलिमा मानुधने यांचेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या दहा जणांना विविध पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव येथील बिंदुबाई हॉल येथे दिलासा व्यसन मुक्ती केंद्राचे अध्यक्ष साहेबराव पाटील, जेष्ठ साहित्यिक प्रा.ए.पी.भालेराव, जिल्हा प्रचारिका आशाबाई बाविस्कर, जिल्हाप्रमुख हरिश्चंद्र बाविस्कर यांच्याहस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. मिनाक्षी चंद्रकांत पाटील, निलीमा निलेश मानुधने, ज्योती भागवत यांना ‘वीर राणी झलकारीबाई विरांगना शौर्य महिला’ पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
मिनाक्षी पाटील या येथील ट्री फाउंडेशनच्या सचिव असुन त्यांनी शहरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी जनजागृती सुरु करून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. यावेळी निवृत्त शिक्षिका शालिनी कोठावदे व नितीन प्रभाकर मेणे यांना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक उत्कृष्ठ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजीवन व्यसन मुक्ती केंद्राचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार, पुष्पलता डहाळे यांना अंगणवाडी मदतनीस पुरस्कार, कृषी सहाय्यक चंद्रकांत गोकुळ यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ओ.बी.सी.सेलचे शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, दत्तात्रय भागवत यांचेसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. ट्री फाउंडेशनच्या वतीने शहरात वृक्ष लागवड हि मोहीम सुरु करण्यात आली असुन त्यास सर्व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नवीन वसाहतींमध्ये प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन मिनाक्षी पाटील यांनी केले आहे.पुरस्कार प्राप्त सर्व पदाधिका-यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.