एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथे एक अतिशय भयंकर घटना घडली असून यात क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान्याचा खून केल्याचे उघडकीस आल्यामुळे परिसर हादरला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्यात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. या प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने संपविल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीत भगवान महाजन याने घटनाक्रम सांगितला. यानुसार भगवान महाजन ( वय६२) आणि सत्यवान महाजन ( वय ५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील रहिवासी होत. दोन्ही एकाच घरात राहत असून त्यांच्यात अनेकदा कुरबुरी होत असत. दिनांक १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी हाणल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला. यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेउन तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला.
तर दुसरीकडे गिरणेत मृतदेह आढळून आल्यानंतर भगवान हा घरातून गायब झाला. त्याने शुक्रवारी उत्राणमधील एकाला फोन करून बोलावत याची माहिती दिली. त्या व्यक्तीने भगवान महाजन याला पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याची सांगितले. मात्र त्याने तेथून पलायन केले. शेवटी उत्राणच्या पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल स्थानकावरून भगवान महाजन याला जेरबंद केले. या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.