Erandol News एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मतदारसंघाच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल ५९ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे.
एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी ५९ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे. यात एरंडोल तालुक्यासाठी ३५ कोटी तर पारोळा तालुक्यासाठी १८ कोटी ८० लाख रूपयांचा समावेश असल्याचे ते म्हणाले, उर्वरित निधीतून एरंडोल पालिकेच्या नवीन इमारतीसाठी ३ कोटी रूपये तर पारोळा पालिका हद्दीतील नवीन वसाहतींमधील खुल्या भूखंडावर विविध ठिकाणी सार्वजनिक उद्यानांचे सुशोभीकरणासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपयोगात येणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
दरम्यान, ५९ कोटी रूपयांच्या निधीतून दोन्ही तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. यात प्रामुख्याने नांदखुर्द येथे अंजनी नदीवर पूल बांधण्यासाठी ६ कोटी, निपाणे ते जवखेडे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी ३ कोटी; कासोदा येथे रस्त्याचे कॉंक्रिटिकरण व तळई ते उत्राण रस्त्यावर डांबरीकरणासाठी सुमारे तीन कोटी रूपये उपयोगात येणार आहे.
उर्वरित कामांमध्ये सावदा येथील रस्त्याचे कॉंक्रिटिकरण व डांबरीकरण, खर्ची तसेच खर्ची गावा-पुढील म्हसावद रस्त्याला लागून रस्त्याचे कॉक्रिटिकरण आणि डांबरीकरणासाठी ३ कोटी मंजूर झाले आहेत. हनुमंतखेडे ते उत्राण रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणासाठी ४ कोटी, ताडे गावापासून रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणासाठी दीड कोटी रुपये, खर्ची येथे पुलाच्या नवीन बांधकामासाठी दोन कोटी रुपये, नांदखुर्द ते फरकांडे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ४ कोटी, गालापूर फाटा ते खडके आणि खडके ते वनकोठे या रस्त्यासाठी ८ कोटी १० लाख रुपये, धरणगाव चौक ते टोळी गावापर्यंत माहिती फलकासह अन्य दिशादर्शक कामांसाठी ४० लाख रुपये यांचा समावेश आहे. या निधीतील कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे.