नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या एचएमपीव्ही व्हायरसच्या बातमीने लोकांच्या कोरोना महामारीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अशातच आता ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचा राज्यात शिरकाव झाला असून नागपुरात २ संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, ‘एचएमपीव्ही’ व्हायरसने भारतातील काही राज्यांमध्ये शिरकाव केल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या बाळाला, त्यानंतर कर्नाटकातही ३ महिन्यांची मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलाला या व्हायरसने बाधा झाल्याचे निदान झाले होते. अशातच नागपूरमध्ये २ संशयित रुग्ण आढळल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. मात्र, त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज पडली नाही. शिवाय आता ते दोघेही ठणठणीत बरे झाल्याची माहिती आहे.
नागपूरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये केलेल्या टेस्टमध्ये दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ७ वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, ही दोन्ही मुलं सध्या बरी झाल्याची माहिती आहे. सगळ्या संदर्भात शासकीय लॅबमधून जीनोम सिक्वेन्सिंग केली जाणार आहे. त्यानंतरच हे रुग्ण ‘एचएमपीव्ही’आहेत का नाही? हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान ‘एचएमपीव्ही’ व्हायरसपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाययोजना काय? असा सवाल करत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकील श्रीरंग भांडारकर यांनी याचिका दाखल केली आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या वेळी सज्ज नव्हती, परिणामी सर्वत्र हाहाकार माजला होता, हजारो नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोनासारखीच परिस्थिती ‘एचएमपीव्ही’ च्या निमित्ताने ओढवू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला निर्देश देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.