अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक, मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व मिष्ठांन्न देऊन विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गोड करण्यात आला.

विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने शिक्षिका सौ.संगीता पाटील सौ गीतांजली पाटील यांनी औक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व पुस्तक वाटप करण्यात आले. उपशिक्षक आनंदा पाटील, ऋषिकेश महाळपूरकर यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे हस्ते रांगोळीत अक्षर गिरवून शालेय शिक्षणाचा शुभारंभ करून घेतला. उपशिक्षक धर्मा धनगर यांनी प्रथम दिवसाची आठवण म्हणून विद्यार्थ्यांचे “शाळेचा पहिला दिवस सेल्फी पॉइंट फ्रेम” मध्ये सेल्फी काढून घेतले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी उपशिक्षिका सौ.पूनम पाटील व शितल पाटील यांनी फुलपाखरुंच्या आकारात नवविद्यार्थ्यांच्या हातांचे लाल व पिवळ्या रंगात कार्डशिट पेपर वर ठसे उमटवून प्रवेशोत्सवाची आगळीवेगळी आठवण जतन करून घेतली. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या अन्ना सोबत मिष्ठांन्न देऊन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड करण्यात आला. यावेळी शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या तर परिसरात ठिकठिकाणी विविधरंगी फुगे टांगून शालेय वातावरण उत्साहवर्धक व आनंदी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद व गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content