जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या एकलव्य रेसिडेन्सी स्कूलच्या रिक्त १ हजार २५७ जागांसाठी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेद्वारे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीत नवीन विद्यार्थ्यांना तर इयत्ता सातवी ते नववीसाठी रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांना ३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे.
सदस्य सचिव महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी मार्फत राज्यात इंग्रजी माध्यमाच्या ३७ एकलव्य रेसिडेंशियल स्कूल चालविल्या जातात. नाशिक अपर आयुक्त कार्यालय नाशिक अंतर्गत १७ एकलव्य शाळा आहे. त्यामध्ये नाशिक प्रकल्पाच्या ५, कळवण, नंदूरबार आणि तळोदा प्रकल्पाच्या प्रत्येकी 3, धुळे प्रकल्पाच्या 2 तर राजूर प्रकल्पाच्या एका शाळेचा समावेश आहे.
इयत्ता सहावीच्या 1020 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात मुलांच्या ५१० तर मुलींच्या ५१० जागांचा समावेश आहे. इयत्ता सातवीच्या १५२, आठवीच्या ४७ तर नववीच्या ३८ रिक्त जागा प्रवेश पूर्वपरीक्षेद्वारे भरण्यात येणार आहे. सातवी ते नववीच्या प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे विद्यार्थी पात्र आहे. तर इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी हा एसटी, डीएनटी, एनटी, एसएनटी प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
प्रत्येक एकलव्य स्कूलमध्ये इयत्ता सहावीसाठी ३० मुले व ३० मुली अशी ६० प्रवेश क्षमता असणार आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सातवी, आठवी, नववीसाठी रिक्त जागांचा अनुशेष भरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल. अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली आहे.