रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या हद्दीत विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षित पायी ये-जा साठी लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेले पादचारी मार्ग सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. स्थानिक दुकानदारांनी या पादचारी मार्गांवर केलेल्या अतिक्रमणामुळे सामान्य नागरिकांसह शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रावेर शहरातील बस स्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान नगरपालिकेने पादचारी मार्गाची निर्मिती केली होती. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व महिलांना सुरक्षितपणे चालता यावे, हा या पादचारी मार्गाचा मुख्य उद्देश होता. मात्र दुकानदारांनी आपल्या दुकानांचे साहित्य, फलक तसेच तात्पुरती दुकाने या पादचारी मार्गांवर उभारल्याने संपूर्ण मार्ग अडविला गेला असून, पादचारी मार्गाचा मूळ उद्देशच फोल ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.

या अतिक्रमणामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून चालताना अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः दररोज शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत असून, पालकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.
या गंभीर समस्येबाबत नगरसेवक पद्माकर महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “ही शहरातील अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी मार्ग तयार करण्यात आला होता. जर कोणी त्यावर अतिक्रमण केले असेल तर संबंधितांना तात्काळ नोटिसा देऊन कठोर कारवाई करण्यात येईल.” प्रशासनाकडून लवकरच अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, रावेर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन अतिक्रमण हटवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पादचारी मार्ग मोकळे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.



