Home प्रशासन नगरपालिका ८० फूट रस्त्यावर अतिक्रमण ; रहिवाशांचे नगरपरिषदेला निवेदन 

८० फूट रस्त्यावर अतिक्रमण ; रहिवाशांचे नगरपरिषदेला निवेदन 


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील ख्वाजा नगर परिसरातील ८० फूट रस्त्यावर झालेल्या कथित बेकायदेशीर अतिक्रमणामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून त्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे धाव घेतली आहे. संबंधित रस्त्यालगत एन.ए. प्लॉट खरेदी करून अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

ख्वाजा नगर परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, घरासमोरील ८० फूट रुंद रस्त्यावर काही व्यक्तींनी अनधिकृतपणे अतिक्रमण करून व्यावसायिक उपक्रम सुरू केले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून परिसरात वारंवार वादाच्या घटना घडत आहेत. यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

रहिवाशांचे म्हणणे आहे की, रस्त्याच्या मूळ आराखड्यानुसार मोकळीक असणे आवश्यक आहे. मात्र अतिक्रमणामुळे आपत्कालीन वाहनांना प्रवेश करणे कठीण होत आहे. भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमण तातडीने हटवून रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांनी प्रशासनाला पर्यायी उपाययोजनाही सुचवली आहे. अतिक्रमणधारकांना नगरपालिकेच्या इतर उपलब्ध जागेवर पर्यायी व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून दोन्ही बाजूंना न्याय मिळेल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. अन्यथा योग्य निर्णय न झाल्यास नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हे निवेदन भूषण वर्मा यांना देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज खान पठाण, पंकज येवले, सचिन बराटे यांच्यासह ख्वाजा नगरमधील प्लॉटधारक व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound