मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. स्वीकृती शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी स्वीकृती शर्मा यांनी मलबार हिल परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
स्वीकृती शर्मा यांचे पती प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रदीप शर्मा यांनी २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंकडून नालासोपारा विधानसभेची निवडणूक लढवली होती. नालासोपारा विधानसभेत हितेंद्र ठाकूर विरुद्ध प्रदीप शर्मा अशी लढत झाली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. प्रदीप शर्मा यांच्यावर २००६ मध्ये कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याचा बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.