Home क्राईम ३०० किलो सोन्याच्या लुटीचा मास्टरमाइंड कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर 

३०० किलो सोन्याच्या लुटीचा मास्टरमाइंड कुख्यात प्रिन्सचा एन्काऊंटर 


हाजीपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । देशभरात ३०० किलोहून अधिक सोन्याच्या लुटीने खळबळ माजवणाऱ्या कुख्यात गुन्हेगार प्रिन्स कुमार उर्फ अभिजीत कुमार याचा पटना STF आणि वैशाली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एन्काऊंटर झाला आहे. बिहारच्या हाजीपूर सदर पोलीस ठाण्याच्या हनुमान नगर कॉलनीत झालेल्या या चकमकीत प्रिन्सचा मृत्यू झाला असून, या कारवाईमुळे राज्यातील गुन्हेगारी जगतात मोठा धक्का बसला आहे.

शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे पटना STF आणि वैशाली पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. प्रिन्स कुमार हनुमान नगरमधील एका घरात लपून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने परिसराला वेढा घातला. छाप्यादरम्यान पोलिसांना पाहताच प्रिन्सने थेट गोळीबार सुरू केला. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले, यात प्रिन्स गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रिन्सच्या एका साथीदाराला हत्यारांसह ताब्यात घेतले आहे. वैशालीचे पोलीस अधीक्षक विक्रम सिहाग यांनी सांगितले की, प्रिन्स उर्फ अभिजीत कुमार हा हुसैना, गोरौल पोलीस ठाणा क्षेत्रातील रहिवासी होता आणि तो अनेक वर्षांपासून फरार होता.

या एन्काऊंटरला वेगळे वळण देणारी बाब म्हणजे मृतक प्रिन्सच्या वडिलांनीच पोलिसांच्या कारवाईचे खुले समर्थन केले आहे. नंदकिशोर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पोलिसांनी काहीही चुकीचे केलेले नाही. मी स्वतः अनेक वेळा पोलिसांना त्याचा एन्काऊंटर करण्यास सांगितले होते. तो आमच्या कुटुंबाशी संबंधित नव्हता, तो गुन्हेगारच होता. पोलिसांनी जे केले ते शंभर टक्के योग्य आहे.” त्यांनी पोलिसांचे आभार मानत या कारवाईचे पूर्ण समर्थन केले.

प्रिन्स कुमार हा बिहारमधील सर्वात मोठ्या सोन्याच्या लुटीतील आरोपी सुबोध सिंहचा जवळचा साथीदार आणि कुख्यात शार्प शूटर होता. त्याच्यावर चोरी, हत्या, आर्म्स अॅक्टसह ३० ते ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. २०१८ मध्ये हाजीपूर न्यायालय परिसरात एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. नंतर त्याला अटक झाली आणि बेउर कारागृहात ठेवण्यात आले होते.

२ सप्टेंबर २०२५ रोजी उपचाराच्या बहाण्याने त्याला पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (PMCH) येथे आणण्यात आले. तेथे आठ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘मटण पार्टी’ देऊन एका खोलीत बंद केले आणि फिल्मी शैलीत पलायन करून तो पुन्हा फरार झाला होता. या घटनेनंतर प्रिन्स बिहार पोलिसांसाठी मोठे आव्हान बनला होता.

प्रिन्स आणि सुबोध सिंह टोळीने देशातील विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या लुटी केल्या होत्या. २०१७ मध्ये पश्चिम बंगालच्या आसनसोल येथे ५६ किलो, २०१९ मध्ये बिहारच्या हाजीपूर येथे ५५ किलो, २०२२ मध्ये राजस्थानच्या उदयपूर येथे २४ किलो, मध्य प्रदेशातील कटनी येथे १६ किलो, तर २०२३ मध्ये देहरादून येथे १८ किलो सोन्याची लूट करण्यात आली होती. एकूण लुटीचा आकडा ३०० किलोहून अधिक असल्याचे तपासात समोर आले होते.

प्रिन्सवर २ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी या एन्काऊंटरला मोठे यश मानले असून, उर्वरित टोळीतील सदस्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे बिहार पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधी कारवाईला नवे बळ मिळाले असून, संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका स्पष्ट झाली आहे.


Protected Content

Play sound