मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघातात निधन झाल्याने आज मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत अजितदादा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बुधवारी प्रवासादरम्यान झालेल्या विमान अपघातात अजितदादांचे निधन झाल्याची वार्ता समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी मुक्ताईनगर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा आणि बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्या होत्या.

प्रवर्तन चौकात शोकसभा गुरूवार दुपारी १२ वाजता प्रवर्तन चौकात शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या प्रसंगी नगरपालिका सदस्य, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा उपस्थित नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितले की, अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्यांची प्रशासकीय पकड आणि सर्वसामान्यांच्या कामाची तळमळ ही सदैव प्रेरणादायी राहील. एका कणखर नेतृत्वाच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.



