
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहरातील मेहरूण परिसरात विचार वारसा फाउंडेशनच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक आणि वैचारिक चळवळीत सक्रिय असलेल्या या संस्थेच्या उपक्रमामुळे परिसरात राष्ट्रभक्तीपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.

सोमवारी (१९ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनी महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख यांनी महाराणा प्रताप यांच्या देदीप्यमान इतिहासावर सविस्तर प्रकाश टाकला.
मार्गदर्शन करताना विशाल देशमुख यांनी सांगितले की, महाराणा प्रताप हे केवळ मेवाडचे राजे नव्हते, तर ते स्वाभिमान, आत्मसन्मान आणि राष्ट्रनिष्ठेचे जिवंत प्रतीक होते. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, अनेक संकटांना तोंड दिले, मात्र कधीही शरणागती स्वीकारली नाही. त्यांचा हा ज्वलंत वारसा आजच्या तरुण पिढीने आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या अभिवादन कार्यक्रमाला विचार वारसा फाउंडेशनचे आशिष राजपूत, मनिष चौधरी, गितेश पवार, आकाश राजपूत, निखिल शेलार, अविनाश पाटील, संकेत म्हस्कर, चेतन माळी, पार्थ वाघ, शुभम निकम, अलका देशमुख, पूजा देशमुख, संगीता राजपूत, अर्चना सोले, सुषमा काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेहरूण परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत सहभाग नोंदवला.



