धरणगाव नगरपालिकेत कोट्यावधींचा अपहार; औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील नगरपालिकेत २० कोटी रूपयांचा अपहार झाल्याची याची धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

 

दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव नगरपालिकेत २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात जवळपास २० कोटींच्या रकमेची अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले आहे. मिळालेल्या अहवालानुसार जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी, धरणगाव नगरपालिका, पोलीस अधिक्षक, नगरविकास विभागाचे सचिव, धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारींचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे फौजदारी रिट याचिका दाखल केली असून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.  याचिकेची सुनावणी ३० जून २०२२ रोजी ठेवण्यात आली आहे.

 

 

एकाच कामासाठी पुन्हा-पुन्हा निविदा काढणे, ई-निविदा न काढणे, एकाच कामाचे तुकडे करून कामांची विभागणी, झालेल्या कामाच्या ठिकाणी माहिती फलक न बसविणे, काम न करताच शासनाच्या तिजोरीतील रक्कम वळती करणे, प्रगतीपथावरील कामाची नोंदवही नसणे, पुन्हा पुन्हा निविदा काढून शासकीय रक्कम वळती करणे, त्रयस्थ संस्थेचे प्रमाणपत्र नसणे, आवश्यकता नसताना कर्मचारी लावणे, जुने पावती पुस्तक जमा न करता नवीन पावती पुस्तके वापरणे, विकासकामे अपूर्ण असतांना देयके अदा करणे, धनादेश साठीची नोंदवही नसणे, धनादेश कुणाला दिले याची नोंद नसणे अशा एकूण ४७९ प्रकारच्या अनियमितता, अपहार व अफरातफरी लेखापरीक्षणात नमूद करण्यात आल्या आहेत.

 

नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी अनियमिततेला व अपहाराला खतपाणी घातला असून लेखापरीक्षण अहवालाच्या अनुषंगाने तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्या विरुद्ध बनावटीकरन, फसवणूक, फौजदारीपात्र न्यासभंग अशा सदराखाली गुन्हा नोंदवून पोलीस यंत्रणेकडून निरपेक्ष तपास व्हावा अशी मागणी जितेंद्र महाजन यांनी केली आहे. याचिकाकर्ते जितेंद्र महाजन यांच्याकडून औरंगाबाद हायकोर्टात ॲड. भूषण महाजन हे कामकाज पाहत आहे.

 

Protected Content